Ad will apear here
Next
गर्द झाडीतलं, निर्मळ कोळिसरे
कोळिसरे येथील लक्ष्मीकेशव मंदिरगणपतीपुळ्याला अनेक जण जातात; पण त्याच मार्गावरचं कोळिसरे हे निसर्गाच्या कुशीत दडलेलं मंदिर आणि तिथला परिसर कुलदैवत नसलेल्या पर्यटकांच्या फारसा परिचयाचा नसतो. गणपतीपुळे आणि जयगडसह आवर्जून भेट द्यावी, असं हे ठिकाण. ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात कोळिसरे आणि परिसराचा फेरफटका...
...............
देवस्थान म्हणजे श्रद्धेनं भेट देण्याचं ठिकाण एवढीच ओळख काही स्थानांसाठी पुरेशी असते. श्रद्धा असली किंवा नसली, तरी काही ठिकाणं निव्वळ पर्यटन आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पाहता येतात. गणपतीपुळ्याला तर अनेक जण जातात; पण त्याच मार्गावरचं कोळिसरे हे निसर्गाच्या कुशीत दडलेलं मंदिर आणि तिथला परिसर कुलदैवत नसलेल्या पर्यटकांच्या फारसा परिचयाचा नसतो. गणपतीपुळे आणि जयगडसह आवर्जून भेट द्यावी, असं हे ठिकाण.

रत्नागिरीहून निवळीमार्गे जयगड रस्त्याला लागलं, की जाकादेवी, चाफे ही गावं मागे टाकल्यानंतर कोळिसरे गावाचा फाटा लागतो. फाट्यापासून कोळिसरे साधारणपणे दोन किलोमीटर आत आहे. कोकणातली आडवाटेवरची सगळीच गावं डोंगरावरच्या गर्द झाडीत लपलेली आणि निसर्गसौंदर्याची भरपूर उधळण असलेली आहेत. कोळिसरे गावात प्रवेश करताना सभोवतीचा निसर्ग असाच मन अतिशय प्रसन्न करतो. कोळिसरेमधल्या लक्ष्मीकेशव मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांची एक छान उतरंड आहे. डोंगराच्या उतारावर, वरून सहज दिसणार नाही, अशा रीतीनं हे मंदिर वसलेलं आहे. त्याचं स्थान आणि एकूण परिसरच आपल्याला प्रचंड उत्साह, ऊर्जा देतो. दाट झाडीत लपलेलं हे मंदिर बघूनच उतरून तिथपर्यंत जाण्याची उत्सुकता दुपटीनं वाढते.

लक्ष्मीकेशवाची मूर्तीलक्ष्मीकेशव देवस्थानाच्या निर्मितीची आख्यायिका खूप रंजक आहे. मराठवाड्यातल्या मालखेडचं राष्ट्रकूट घराणं (इ. स. ७५० ते ९७३) महाराष्ट्रावर राज्य करत होतं. त्यांची विष्णूवर अतिशय भक्ती होती. या घराण्याच्या सदस्यांनी अनेक ठिकाणी विष्णूच्या सुंदर मूर्तींची स्थापना करून, त्यांची मंदिरं बांधली. अनेक वर्षांनंतर हा भाग यादव घराण्याच्या अंमलाखाली आला. त्याच सुमारास परकीय मुस्लिम आक्रमकांनी मंदिरं आणि मूर्ती यांच्यावर हल्ले करायला सुरुवात केली होती. त्यांच्यापासून विविध देवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. त्यातलीच ही लक्ष्मीकेशवाची एक मूर्ती. ती कोल्हापूरला हलवण्यात येऊन रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर वऱ्हवडे गावातले श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे या तिघांना मूर्ती कुठे आहे, याचा दृष्टांत झाला. त्यांनी कोल्हापूरला जाऊन मूर्ती ताब्यात घेतली. ती एका लाकडी पेटीत घालून खाडीतून देवरूख-संगमेश्वरमार्गे आणत असताना विश्रांतीसाठी कोळिसरे गावात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मूर्तीची पेटी एवढी जड झाली, की त्यांना उचलता येईना. त्याच वेळी कोळिसरे गावातले ग्रामस्थ भानुप्रसाद तेरेदेसाई यांना ‘या मूर्तीची प्रतिष्ठापना गावातच करावी,’ असा दृष्टांत झाला आणि ही मूर्ती गावातच ठेवून या लक्ष्मीकेशव मंदिराची उभारणी करण्यात आली, असं सांगितलं जातं.

सन १५१०मध्ये तेरेदेसाई कुटुंबीयांनी हे मंदिर बांधलं. हेच तेरेदेसाई दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजे गोपाळगडाचे किल्लेदार होते. मंदिराची उभारणी करत असताना एका ठिकाणी खणताना पाण्याचा झरा सापडला. तिथून स्वच्छ आणि शुद्ध पाणी अखंडपणे वाहत होतं. तो झरा अजूनही देवळाच्या खालच्या बाजूला आहे आणि बारमाही वाहतो. निसर्गाचे असे काही चमत्कार खरंच माणसाला थक्क करून सोडतात.

देवळातली लक्ष्मीकेशव मूर्ती अतिशय आकर्षक आणि सुबक आहे. काळ्या संगमरवरात ती घडवलेली असून, पाच फूट उंचीची आहे. चार हातांपैकी उजव्या हातात कमळ, एका हातात शंख, डाव्या हातात चक्र आणि गदा अशी शस्त्रं आहेत. मूर्तीच्या मागे प्रत्येक बाजूला पाच, असे विष्णूचे दहा अवतारही कोरलेले दिसतात. अतिशय वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना होते.

जयगड किल्लाकोळिसरे पाहून मन प्रसन्न झालं, की मुख्य रस्त्याला येऊन जयगडच्या मार्गाला लागावं. जयगड हा जलदुर्ग असला, तरी त्याच्या तीन बाजूंना पाणी आणि एका बाजूला जमीन आहे. शास्त्री नदीच्या खाडीत हा किल्ला बांधण्यात आला आहे. बारा एकर परिसरातला हा किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत आहे. त्याची भक्कम तटबंदी लांबूनच लक्ष वेधून घेते. किल्ल्यात मध्यभागी हनुमान आणि गणपतीचं मंदिर आहे. गडाचं बांधकाम अंदाजे सतराव्या शतकात झालं. पुढे हा किल्ला मराठी आरमारात दाखल झाला. किल्ल्यापासून जवळच असलेला, ब्रिटिशकालीन दीपस्तंभही पाहण्यासारखा आहे. १९३२मध्ये त्याची उभारणी करण्यात आली होती. दुपारनंतर या दीपस्तंभाच्या मनोऱ्यावरही जाता येतं. इथून जवळच जयगड बंदर असून, तिथले बोटींचे आणि मच्छीमारीचे व्यवहार पाहणं, हेसुद्धा एक उत्तम मनोरंजन आहे.

कऱ्हाटेश्वर मंदिरजयगडपासून पाच किलोमीटरवर असलेलं कऱ्हाटेश्वर मंदिर हेसुद्धा आवर्जून भेट देण्यासारखं ठिकाण. हे पूर्णपणे लाकडी बांधकाम केलेलं मंदिर असून, ते एका तुटक्या कड्यावर असल्यासारखं वाटतं. मंदिरामागे असलेल्या पायऱ्या उतरून गेल्यानंतर दिसणारा काळा दगडी कातळ, समोरचा अथांग आणि निळाशार समुद्र हे दृश्यच मन मोहून टाकतं. इथल्या कातळावर बसून समुद्राच्या लाटांचा खेळ पाहण्यातला आनंदही अविस्मरणीय आहे.

अतिशय प्रसिद्ध असलेलं गणपतीपुळे देवस्थान इथून जवळच आहे. पूर्वीच्या मंदिराचं रूप बदलून आता आकर्षक मंदिराची उभारणी झाली असली, तरी समुद्राकाठचं स्थान, रचना आणि निसर्गसौंदर्य अजूनही तसंच आहे. गणपतीपुळे मंदिराची डोंगराभोवतीची प्रदक्षिणाही आनंददायी आहे. 

गणपतीपुळ्याचं गणेश मंदिरगणपतीपुळ्याच्या समुद्रात डुंबताना मात्र अतिशय काळजी घ्यायला हवी. कारण इथला समुद्र जास्त धोकादायक आहे. किनाऱ्यावर बसून कितीही काळ क्षितिजाकडे बघत राहण्याचा आनंद मात्र मनसोक्त घेता येतो. प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे इथे सतत पर्यटकांची वर्दळ असते आणि किनाऱ्यावर अनेक मनोरंजक खेळांचा आनंदही घेता येतो. कोकणातली वैशिष्ट्यं सांगणारं एक प्रदर्शनही गणपतीपुळे मंदिराच्या समोरच आहे. तिथेही भेट देता येईल. गणपतीपुळ्यापासून जवळच, अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मालगुंड गावात कवी केशवसुत यांचं स्मारक आहे. केशवसुतांच्या जन्मगावी उभारण्यात आलेलं हे स्मारक अवश्य भेट देण्यासारखं आहे. केशवसुतांच्या गाजलेल्या कवितांचं इथे संकलन आणि जतन करून ठेवण्यात आलं आहे. अशा प्रकारे एखाद्या साहित्यिकाचं स्मारक जपणं आणि ते पाहायला मिळणं, ही अभिमानाची बाब आहे.

मालगुंड येथील कवी केशवसुतांचे स्मारककसं जायचं?
पुणे किंवा मुंबईहून चिपळूण-संगमेश्वरमार्गे रत्नागिरीच्या दिशेने निघाल्यावर हातखंब्याच्या अलीकडे निवळी फाटा लागतो. तिथून जयगड-गणपतीपुळे फाटा आहे. त्या मार्गावर गेल्यावर जाकादेवीनंतर कोळिसरे फाटा लागतो. कोळिसरे पुण्याहून सुमारे ३१५ किलोमीटर अंतरावर, तर मुंबईहून सुमारे ३८५ किलोमीटरवर आहे.

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(‘चला, भटकू या’ हे सदर दर बुधवारी प्रसिद्ध होते.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZIKBC
Similar Posts
रमणीय रत्नागिरी जिल्हा – भाग दोन ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रत्नागिरी शहरातील काही पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या रत्नागिरी जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची...
आनंदाचा झुळझुळता झरा - आसूदबाग बाळगोपाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, की घरातल्या सर्वांनाच वेध लागतात ते फिरायला जाण्याचे. हा ट्रेंड आता फक्त मामाच्या गावाला जाण्याइतकाच मर्यादित राहिलेला नाही. थोडी वेगळी ठिकाणं पाहायला जाण्याचं, मनसोक्त भटकंती करण्याचं प्रमाण आता वाढीला लागलं आहे. तसंच पर्यटनाचा कालावधी केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीपुरताच मर्यादित राहिलेला नाही
मार्लेश्वरची डोंगरलेणी कोकणातली डोंगरातली, आडबाजूची शिवमंदिरं ही संस्कृतीची, निसर्गाची एक सुंदर देणगी आहे. आजच्या ‘चला भटकू या’च्या भागात करू या अशाच रम्य अशा मार्लेश्वर मंदिराची आणि धबधब्याची सफर...
ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार रत्नागिरी : ‘नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने २०१२ साली घेतला होता. तो बदलून आता नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language